छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : निवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे हत्या प्रकरणाच्या तपासात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल राठोडने हत्येसाठी वापरलेले पिस्तूल मध्य प्रदेशातील उज्जैन येथून आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी करण आडे याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने २२ मार्चपर्यंत वाढ करण्याचे गुरुवारी (दि.१९) आदेश दिले आहेत.
अधिक माहितीनुसार, गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल राठोडच्या घरझडतीत पोलिसांनी अॅपल कंपनीचा लॅपटॉप, गुन्ह्यासंदर्भात महत्त्वाचे दस्ताऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार (एमएच-४६-बीए-६५९८) जप्त केली आहे. तर मृत लोंढे यांना पुरताना वापरलेले दोन फावडे आरोपी आडे याच्याकडून पोलिसांनी जप्त केले आहेत. दरम्यान, यापूर्वी अटकेतील मुख्य आरोपी विशाल राठोडच्या पोलिस कोठडीतही २२ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे, तर आरोपी आकाश पवार याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपी करण आडे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी मृताच्या अंगठ्या व मोबाईल आरोपींकडून हस्तगत करणे बाकी आहे. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का आणि गुन्ह्याचा नेमका हेतू काय होता, याचा तपास बाकी असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.













